दौसा- पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींच्या हस्ते एक्सप्रेसवेचे उद्घाटन होणार आहे. या दौऱ्यापूर्वी स्थानिक पोलीस सुरक्षेचा आढवा घेत असताना पोलिसांनी दौसा जिल्ह्यातील खान भंकरी रोडजवळ स्फोटके घेऊन जाणाऱ्या व्हॅनसह एका आरोपीला अटक केली. या गाडीतून ६५ डेटोनेटर, १,००० किलो स्फोटके आणि ३६० जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली ४० पोती जप्त करण्यात आली. या घटनेनंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.
‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित दौऱ्याआधी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांना एका खबऱ्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांनी भरलेल्या एका व्हॅनची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने खान भंकरी रोडवर बंदोबस्त केला आणि येथे एक पिकअप व्हॅन पकडली. डेटोनेटर, कनेक्टिंग तारा आणि इतर स्फोटकांनी भरलेल्या ४० पोत्यांसह ही व्हॅन जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक देखील केली आहे असे, दौसा पोलीस अधीक्षक संजीव नैन यांनी घटनेची माहिती देताना सांगितले.
या गाडीचा चालक राजेश मीणा याच्याकडे चालक परवाना आणि परमीटची मागणी केली असता त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. स्फोटकांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी त्याला अटक केली असून स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी व्यास मोहल्ला येथील रहिवासी आहे. ही स्फोटके तो खोदकामासाठी घेऊन जात असल्याचे त्याने प्राथमिक चौकशीत सांगितले.