नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार ८ वर्षांपासून ‘जय जवान, जय किसान’ मूल्यांचा अपमान करत आहे. यापूर्वी त्यांनी कृषी कायदे केले होते. ते त्यांना मागे घ्यावे लागले. आता अग्नीपथ योजना जाहीर केली आहे. तिला विद्यार्थी आणि तरुणांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे त्यांना ही योजना कृषी कायद्यांप्रमाणे मागे घ्यावी लागेल आणि माफीवीर बनवून पंतप्रधान मोदींना तरुणांची माफी मागावी लागेल, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये मोदी सरकारवर चढला. मोदी सरकारने यापूर्वी ३ काळे कृषी कायदे केले होते. त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ आंदोलन केले. त्यामुळे शेवटी मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले. त्यावेळी सुद्धा सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागतील असे मी सांगितले होते. आता आज परत सांगतो अग्निपथ योजना सरकारला मागे घ्यावी लागेल. शेतकऱ्यांप्रमाणे तरुणांची मोदींना माफी मागावी लागेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सरकारची ही योजना तरुणांना मान्य नाही. शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनी ती नाकारली आहे. नोटबंदी अर्थतज्ज्ञांनी नाकारली. जीएसटी व्यापाऱ्यांनी नाकारली आहे. परंतु सामान्यांचा हा विरोध पंतप्रधानांना ऐकू येत नाही. ते मित्रांचा आवाज ऐकण्यात मग्न आहेत. त्यातून त्यांना काहीच ऐकू येत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली.