संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, पण मीच प्रत्येकवेळेस बोलण्याचा ठेका घेतला नाहीय!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- देशात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. महाराष्ट्रावर याचे खापर फोडणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हणत या आरोपांबद्दल सरकारमधील लोकांनी बोलले पाहिजे. मीच प्रत्येकवेळी बोलण्याचा ठेका घेतला नसल्याचा संताप व्यक्त करत, राऊत यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींचे आरोप राऊत यांनी खोडून काढले. ते दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. ’मी महाराष्ट्राचा नेता आहे. ही महामारी चीनमधून आली. जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्यात तथ्य असल्याचे कबूल केले आहे. मात्र यासंदर्भात पंतप्रधानांनी महाराष्ट्रावर केलेली टीका ऐकून मला वाईट वाटले असल्याचे, राऊत काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले महाराष्ट्रासारख्या राज्यावर खापर फोडणे चुकीचे आहे. जिथे जागतिक आरोग्य संघटनेने धारावी पॅटर्नचे कौतुक केले. महाराष्ट्रातील सरकार, मुंबई महापालिका कसे काम करतेय याचे दाखले, आदर्श सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना दिलेत,’ याची आठवणही पंतप्रधान मोदींना करुन दिली. पण ’यासंदर्भात सविस्तर मत प्रतिक्रिया राज्य सरकारतर्फेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडायला हवी. मी माझे एक मत मांडले. सरकारमध्ये जे बसलेले आहेत त्यांनी बोलायला हवे. प्रत्येक वेळेस मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही. ते काय करतायत? सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची, सांगण्याची. त्यांनी बोलावं! हा सरकारवर ठपका आहे,’ असे म्हणत राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारने गप्प बसू नये असेही म्हटले आहे.
’जागतिक आरोग्य संघटनेने केलेले कौतुक, न्यायालयाने दिलेले दाखले या सर्व गोष्टींचा विचार न करता महाराष्ट्र आणि मुंबईमुळे ही महामारी पसरली असे सांगणे हे महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा लोकनियुक्त सरकारने केलेला अपमान आहे,’ असा संतापही राऊत यांनी यावेळी व्यक्त करत, भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी देखील ते महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवे, असेही राऊत म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami