संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या काळात ईडीच्या धाडींमध्ये २७ पट वाढ झाली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कार्यकाळात ईडीने ११२ छापे घातले होते. मात्र भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या २०१४ ते २०२२ या ८ वर्षांच्या कारकिर्दीत ईडीने ३ हजार १० छापे घातले. म्हणजे ईडीच्या धाडींमध्ये २७ पट वाढ झाली, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
पीएमएलए अंतर्गत जुन्या प्रकरणांमधील प्रलंबित तपास निकाली काढण्यासाठी आणि नवीन प्रकरणांचा तपास कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ईडीने या धाडी घातल्या. त्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे. ईडीची अनेक प्रकरणे गुंतागुंतीची आहेत. त्यांचा तपास वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यामुळे यातील आरोपींची संख्या वाढते. पीएमएलए २००२ मध्ये लागू करण्यात आला. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ जुलै २००५ पासून सुरू झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएचे डॉ. मनमोहन सिंग सरकार २००४ ते २०१४ या काळात सत्तेवर होते. नंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे नरेंद्र मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आले. सिंग सरकारच्या कार्यकाळात ईडीने ११२ छापे घातले. त्यात ५,३४६.१६ कोटींची प्रकरणे उघडकीस आणली. यात १०४ खटले दाखल केले. मात्र या काळात मनीलॉन्ड्रीगच्या गुन्ह्यात एकही आरोपीला दोषी ठरला नाही. कोणतीही मालमत्ता जप्त झाली नाही. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात ईडीने ८ वर्षांत ३,०१० धाडी घातल्या. ९९ हजार ३५६ कोटींची संपत्ती जप्त केली. ८८८ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले. २३ आरोपी दोषी ठरले. या गुन्ह्यांमध्ये ८६९.३१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री चौधरी यांनी दिली. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. ईडीची अनेक प्रकरणे जुनी आणि जटील आहेत. त्यांचा एकत्र तपास, तंत्रज्ञान आणि इतर बाबी खूप किचकट आहेत. त्यासाठी सुधारित कार्यप्रणालीचा वापर आवश्यक ठरतो, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami