मुंबई- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडातर्फे सरळसेवा भरतीअंतर्गत तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षांना ३१ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून आता ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या परीक्षेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सर्व परीक्षार्थींची मेटल डिव्हाईस द्वारे तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली आहे.
म्हाडातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यातील दोन परीक्षा केंद्रांवर काही उमेदवारांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर मेटल डिव्हाईसद्वारे परीक्षार्थींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.परीक्षा प्रक्रियेबाबत माहिती देताना सागर यांनी सांगितले की, ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या परीक्षेदरम्यान दोन परीक्षा केंद्रांवर उमेदवाराच्या जागी डमी उमेदवार बसल्याचे निदर्शनास आले आहे.
याप्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डमी उमेदवाराकडून पोलिसांनी चीप असलेले एक इलेक्ट्रॉनिक उपकरण हस्तगत केले आहे.म्हाडाची परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली जात आहे, असे सांगत सागर पुढे म्हणाले की, परीक्षेला आलेल्या सर्व उमेदवारांचे फोटो काढले जातात व खात्री पटल्यानंतरच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जातो. संपूर्ण परीक्षेच्या दरम्यान प्रत्येक उमेदवार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असतो.