नवी दिल्ली- नुकताच दिवाळीचा सण पार पडला आहे.तुलसी विवाह सणाची समाप्तीही आजच झाली आहे.मात्र,आता राजधानी दिल्लीसह देशभरातील व्यापाऱ्यांसाठी येणारा काळही दिवाळीसारखाच अधिक आनंदाचा असणार आहे.कारण १४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरपर्यंतचा काळ हा लग्नाचा हंगाम असणार आहे.नुकत्याच सीएआयटी अर्थात रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार,या कालावधीत देशभरात सुमारे ३२ लाख विवाह होतील. ज्यामध्ये साधारण ३.७५ लाख कोटींची आर्थिक उलाढाल होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
सीएआयटीने सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, या हंगामात सुमारे ५ लाख विवाहांसाठी प्रत्येकी अंदाजे ३ लाख रुपये खर्च येईल. तर, सुमारे १० लाख विवाहांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये खर्च येईल. १० लाख लग्नांसाठी १० लाख रुपये, ५ लाख लग्नांसाठी २५ लाख रुपये,५० हजार लग्नांसाठी ५० लाख रुपये आणि आणखी ५० हजार लग्नांसाठी १ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम खर्च करण्यात येईल. या एका महिन्यात लग्नाच्या खरेदीतून सुमारे ३.७५ लाख कोटी रुपये व्यापार क्षेत्रात येणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर, लग्नाच्या हंगामाचा पुढचा टप्पा १४ जानेवारी २०२३ पासून सुरू होऊन तो जुलैपर्यंत असेल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सीएआयटीचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले की, फक्त दिल्लीत या आगामी हंगामात ३.५ लाखांहून अधिक विवाहसोहळे अपेक्षित आहेत.या विवाहातून सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे २५ लाख विवाह झाले होते आणि त्यासाठी ३ लाख कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.