नवी मुंबई- यंदा पाऊस उशीरापर्यंत रेंगाळत राहिल्याने द्राक्षाची आवक लांबणीवर पडली आहे. ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडल्याने द्राक्षाची छाटणी उशिरा होणार आहे.त्यामुळे दरवर्षी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये वाशीतील एमपीएससी मार्केटमध्ये सुरू होणारा द्राक्षाच्या विक्रीचा हंगाम यावेळी जानेवारी महिन्यात सुरू होणार असल्याचे द्राक्ष व्यापाऱ्यांनी सांगितले.
वास्तविक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये द्राक्षाची आवक सुरू झाली की जानेवारीत द्राक्षाचे प्रमाण वाढलेले असते.साधारणपणे १५ नोव्हेंबर ते १५ एप्रिल असा हा द्राक्षाचा बाजारातील हंगाम असतो.सातारा, सांगलीतील तासगाव आणि नाशिकच्या अनेक भागातून मोठ्या प्रमाणात नवी मुंबईच्या फळ बाजारात आवक होत असते.फळ व्यापारी सूर्यकांत कोरडे यांनी सांगितले की, यंदा पावसामुळे छाटणीला उशीर होणार असल्याने उत्पादन घ्यायलाही उशीर होणार आहे.त्यामुळे जानेवारी महिन्यातच प्रत्यक्ष द्राक्षे बाजारात दिसतील. दरम्यान,यंदाच्या वर्षी पावसामुळे द्राक्षाचे गणित कोलमडले असल्याने आणि रोगराई पसरणार असल्याने फवारणी जादा करावी लागणार आहे.त्यामुळे खर्चही वाढणार आहे.