उस्मानाबाद -यंदाच्या खरीप हंगामातील पिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. सोयाबीला गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला होता आता यलो मोजॅकचा प्रादुर्भावाने सोयाबीनवर संकट आले आहे.
उस्मानाबाद, बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक आल्यावर लागलीच गोगलगायीने सोयाबीन फस्त केले होते. आता पिकाची वाढ होत असतानाच यलो मोजॅक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पिके ही पिवळी पडत असून जागेवर वाळून जात आहे. सततच्या संकटाला त्रासून कळंब तालुक्यातील एकरुका येथील शेतकऱ्याने तर 5 एकरवरील सोयाबीन मोडले आहे. उभ्या पिकात शेतकऱ्याने रोटर घालून सोयाबीन मोडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेती करावी तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.