यवतमाळ – लग्नात बिर्याणी खाल्ल्याने सुमारे दोनशे जणांना विषबाधा झाल्याची घटना यवतमाळच्या पुसद तालुक्यातील ईसापूर धरण येथे घडली. यापैकी १८ जणांना पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. तर, १४ जणांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली. तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची तब्येत बरी असल्याचे कळते आहे. दरम्यान, विषबाधा नक्की कशामुळे झाली याबाबत अद्याप कळलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुसदपासून २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ईसापूर येथे लग्न सोहळ्यात पाहुणीमंडळी जमली होती. जेवणात बिर्याणीचा बेत होता. बिर्याणीवर पाहुण्यांनी ताव मारल्यानंतर काहीजणांच्या पोटात दुखू लागले. अनेकांना सतत शौचास होऊ लागली, काहींना ओकाऱ्या झाल्या. ही लक्षणे पाहताच अन्न विषबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेबाबत कळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जय नाईक यांनी सायंकाळी तातडीने शेंबाळपिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन रुग्णांच्या उपचाराबद्दल माहिती घेतली. तसेच आमदार इंद्रनील नाईक यांनी तातडीने रुग्णालयात भेट देऊन बाधितांची विचारपूस केली.