यवतमाळ – यंदा जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्याचा तुडवडा जाणवत आहे. जिल्ह्याला ३५ हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता असताना महाबीजकडून पुरवठा मात्र फक्त ३ हजार ५०० क्विंटल इतकाच झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाण्याचा तुडवडा निर्माण झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात साधारणतः तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात येते. यासाठी जवळपास ७८ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज असते. यातील ३५ हजार क्विंटल बियाणे हे महाबीजकडून शेतकऱ्यांना पुरवण्यात येतात. मागील अनेक वर्षांपासून विश्वासार्ह बियाणे म्हणून शेतकरीसुद्धा महाबीज बियाणाची लागवड करतात. मात्र यावर्षी जिल्ह्याला केवळ तुटपुंज्या साडेतीन हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा महाबीजकडून करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर हा साडेतीन हजार बियाणांचा तुटवडा टप्प्याटप्प्याने करण्यात आला आहे. यापुढेही महाबीज बियाण्यांचा पुरवठा होईल, याचीही शाश्वती नाही. दरवर्षी महाबीजकडून जिल्ह्यात ३५ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा केला जात होता. मात्र यावेळी फक्त ३ हजार ५०० क्विंटल बियाणांचाच पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे महागडे सोयाबीन बियाणे घेण्याची वेळ आली आहे.