मुंबई – दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे वादात सापडली आहे. तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. साई पल्लवीने बॉलिवूड चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने नवा वाद सुरू झाला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर नुकतंच साई पल्लवीने तिच्या या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देत या संपूर्ण वादावर लोकांची माफी मागितली आहे.
दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत, असे साई पल्लवीने म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला होता. साई पल्लवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने या संपूर्ण वादावर मौन सोडले आहे. साईने या वादावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ‘आपले विधान चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले.’ ती म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच तुम्हा सर्वांशी अशाप्रकारे बोलत आहे. नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलणार आहे. मी कबूल करते की मी माझे म्हणणे मांडण्यासाठी बराच वेळ घेतला आहे पण मला माफ करा. माझा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडला गेला. माझ्या मुलाखतीत मला एवढेच सांगायचे होते की, धर्माच्या नावावर कोणताही वाद होणे ही चुकीची गोष्ट आहे. मी तटस्थ राहून माझे उत्तर दिले. मला आश्चर्य वाटते की, माझे शब्द अशाप्रकारे दाखवले गेले आहेत. मुलाखतीत सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेतल्या आहेत. मी जेव्हा काही बोलते तेव्हा त्याचा अगदी तटस्थपणे विचार करते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी तटस्थ विचार करणारी व्यक्ती आहे पण माझ्या वक्तव्यानंतर बाहेर जे काही घडलं ते पाहून मला स्वत:ला मोठा धक्का बसला. या सर्व प्रकारामुळे मला खूप दुःख झाले आहे. आता इथून पुढे मी काहीही बोलण्याआधी दोन वेळा विचार करेन’, असे साई पल्लवीने स्पष्टीकरण देताना म्हटले.