नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ८ वाजता युक्रेन-रशिया युद्ध परिस्थितीवर नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर भर दिला. ते म्हणाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना बाहेर काढणे ही प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांसोबत अधिक सहकार्य केले जाईल.
दरम्यान, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने आपल्या हवाई सीमा बंद केल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांना युक्रेनमधून हंगेरी, पोलंड, स्लोव्हाकिया आणि रोमानियामध्ये रस्तेमार्गाने आणले जात आहे. तिथून ते विमानाने भारतात येत आहेत.
युक्रेनमध्ये रशियन युद्धापूर्वी २० हजार भारतीय उपस्थित होते. त्यापैकी ४ हजार प्रवासी युद्ध सुरू होण्यापूर्वी भारतात आले. युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने नागरिकांच्या परतीसाठी ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. याअंतर्गत आतापर्यंत चार उड्डाणे झाली आहेत. पहिल्या विमानात २७० भारतीय मुंबईत पोहोचले. त्यानंतर दुसऱ्या विमानात २५० भारतीय आणि तिसऱ्या विमानातून २४० प्रवासी भारतात पोहोचले. तर चौथ्या विमानाने १९८ भारतीयांना बुखारेस्टहून दिल्लीला नेण्यात आले.