लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. ९ जिल्ह्यातील ५९ मतदार संघासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५८.१ टक्का इतके मतदान झाले. चौथ्या टप्प्यातील या निवडणुकीत योगी मंत्री मंडळातील अर्धा डझन मंत्र्यांसह विविध पक्षांच्या ६२४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून १० मार्चला निकाल आहे.
यूपीतील सातपैकी तीन टप्प्यांचे मतदान यापूर्वीच पार पडले तर आज बहुचर्चित लखीमपुर खिरी, पिलभीत, सीतापुर, हरदोई, उन्नाव, लखनौ, बांदा, रायबरेली आणि फतेपूर या ९ जिल्ह्यातील ५९ जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत बहुतेक मतदार संघात ३५ते ३८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग मंदावला आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५८.१ टक्का इतके मतदान झाले. यात लखनौमध्ये ५५.२ टक्के ,सीतापुर् मध्ये ५९.१२, सिधोलीमध्ये ६२.८९,फातेपुरमध्ये ५८.१३, बांदामध्ये ५८.२१, तर लखीमपुर खिरीमध्ये सर्वाधिक ६३.१० टक्के मतदान झाले. मात्र काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर कोणतेही बटन दाबले तरी कमळावर मतदान होत. ही बाब निवडणूक अधिकार्याच्या लक्षात आणून देताच, मतदान यंत्र बदलण्यात आले. त्यासाठी २ तास मतदान थांबवण्यात आले होते. उन्नाव जिल्ह्यात वीज आणि पाण्याच्या मुद्द्यावर अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकारही घडले अशा काही किरकोळ घटना वगळता मतदान अत्यंत शांततेत पार पडले. आजच्या मतदानानंतर योगी मंत्रिमंडळातील हेवीवेट मंत्री ब्रिजेश पटेल यांच्यासह ६ मंत्र्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. दरम्यान प्रसिद्ध शायर मूनावर राना यांचे मतदार यादीतून नावाच गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही.