शिर्डी – साई भक्तांसाठी एक खुशखबर आहे. येत्या १८ फेब्रुवारीपासून पुणे-शिर्डी, नागपूर विमानसेवा सुरू होत आहे. नागपूर व पुणे विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून प्रवाशांसह साई भक्तांचीही मागणी होती. त्यानुसार विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशील कुमार श्रीवास्तव यांनी दिली.
कोरोनामुळे मध्यंतरी १८ महिने कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरील विमानसेवा बंद होती, आता ती सुरळीत झाली आहे. सध्या चार ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू आहे. बंगळुरूसाठी २, दिल्लीसाठी १, हैदराबादसाठी १, चेन्नईसाठी १ अशा पाच विमान फेऱ्या आहेत. आता पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा सुरू होणार आहे. पुणे येथून येणारे विमान शिर्डी येथे येईल व तेच नागपूरला जाणार आहे. तसेच त्याच दिवशी हे विमान नागपूरहून शिर्डीला येईल आणि तिथून पुण्याला जाणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवण्याचा विमान कंपनीचा मानस आहे. विमानतळ विकास प्राधिकरणाने याबाबतची तयारी केली आहे. एअर इंडिया ही विमानसेवा सुरू करणार आहे, अशी माहिती देण्यात आली.