नाशिक – येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील रहिवासी असलेले लष्करी जवान नारायण निवृत्ती मढवई या ३९ वर्षांच्या जवानाला हरियाणातील हिसार येथे ४२ आरमाड रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते. त्यानंतर काल जवान मढवई यांच्या पार्थिवावर मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरमरण पावलेल्या या जवानाच्या अंत्ययात्रेप्रसंगी भारत माता की जय, वीर जवान अमर रहे, अशा घोषणा देत नागरिक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
दरम्यान, यावेळी ठिकठिकाणी गावातील महिलांसह नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत आपल्या गावाच्या वीर सुपुत्रास आदरांजली वाहली. त्यानंतर घरातील वडील निवृत्ती मढवई, आई ताराबाई, चुलते साहेबराव, सोपान, भाऊ बाळासाहेब, भाऊसाहेब, पत्नी सोनाली आणि मुलगा कृष्ण, हरीश, बहिण शीला बोरनारे व नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर लष्कर, पोलीस व जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी पार्थिवास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर मुलाच्या हस्ते वीर जवानास अग्नी देण्यात आला. शहीद जवान नारायण मढवई यांची अंत्ययात्रा तब्बल दोन तास चालली होती. गावात प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी काढण्यात आली होती.