ठाणे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद धुमसत असतानाच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी एक अतिशय वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण माझ्यामते त्यांनी काही घातले नाही तरी त्या छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
ठाण्याच्या ढोकळीमधील हायलँड पार्क येथे रामदेव बाबांच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिराला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 30 हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात महिलांबाबत बोलताना रामदेव बाबांची जीभ घसरली. ते म्हणाले की, महिला साडीमध्येही चांगल्या वाटतात. सलवार सूटमध्येही चांगल्या वाटतात आणि माझ्या नजरेत तर त्यांनी काही नाही घातले तरी त्या चांगल्या वाटतील. बाबांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये खळबळ माजली. महिलांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पण आयोजकांकडून मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाबांच्या या भाषणाच्या वेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
वास्तविक महिलांबद्दल कुणी काही चुकीचे बोलले, तर त्याच्याविरोधात प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वात पुढे असणार्या अमृता फडणवीस यावेळी मात्र रामदेव बाबांचे वादग्रस्त विधान ऐकूनही गप्प होत्या. दरम्यान, रामदेव बाबांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे प्रचंड संतापल्या आहेत. रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.