लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते योगी आदित्यनाथ आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात यांनी १ कोटी ५४ लाख ९४ हजार ०५४ रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये रोख रक्कम, सहा बँक खात्यांची शिल्लक आणि बचत यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी असेही घोषित केले की त्यांच्याकडे १२ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल फोन, एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि ८० हजार रुपये किमतीची रायफल आहे.त्यांच्या संपत्तीतही गेल्या चार वर्षांत ५९ लाख रुपयांनी वाढ झाली आहे.
प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की ४९ हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि १० ग्रॅम वजनाचे रुद्राक्ष गळ्यातील दागिने योगी आदित्यनाथ यांच्याकडे आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये १३ लाख २० हजार ६५३ रुपये, आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १५लाख ६८ हजार ७९९ रुपये उत्पन्न, आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये १८ लाख २७ हजार ६३९ रुपये उत्पन्न आणि आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी १४ लाख ३८ हजार ६७० रुपये उत्पन्न घोषित केले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार योगी आदित्यनाथ यांच्याकडे कोणतीही कृषी किंवा अकृषिक मालमत्ता नाही. त्याच प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नोंदणीकृत नाही किंवा त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. योगी आदित्यनाथ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याविरुद्ध कोणतेही प्रलंबित गुन्हेगारी खटले नाहीत.
योगी आदित्यनाथ २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांची संपत्ती ७२ लाख १७ हजार रुपयांची होती. २०१४मध्ये त्यांच्याकडे तीन अलिशान गाड्या होत्या. २०१७मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्या वेळी त्यांची संपत्ती ९५.९६ लाख रुपये होती. ती आता एक कोटी ५४ लाख ९४ हजार रुपयांची झाली आहे. त्यांच्याकडे एक लाख रुपये रोख रक्कम आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करायला जायच्या आधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक सभाही घेतली. गोरखपूरचे पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गोरखपूर शहरी जागेवर ३ मार्च रोजी मतदान होणार आहे.