नवी दिल्ली – आपणा सर्वांना माहित आहे की, सुदृढ आरोग्यासाठी शरीर व मन निरोगी असायला हवे. शरीर व मनाची काळजी घ्यायला हवी. खरंतर निरोगीपण जपायला भारतीय प्राचीन संस्कृतीतील आयुर्वेद आणि योग या शास्त्रांची आपल्याकडे खाण आहे. तिचे महत्त्व नागरिकांना सांगण्यासाठीच २०१५ सालापासून दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार, भारतासह जगभरात आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हैसूर पॅलेस मैदानावर १५ हजारांहून अधिक लोकांसह योग सोहळ्यात सहभागी झाले. आज सकाळी त्यांनी ताडासन, त्रिकोनासन, भद्रासन या आसनांनी योग करण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान म्हणाले, ‘योग हे आता जागतिक पर्व बनले आहे. ते जीवनाचा भाग नसून जीवनाचा मार्ग बनले आहे.’ दरम्यान, यंदा ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’ ही आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम म्हणून निवडण्यात आली होती. ज्याचा अर्थ मानवतेसाठी योग असा आहे.
योग दिन सोहळ्यात मोदी म्हणाले, ‘आज योग मानवजातीला निरोगी जीवनाचा आत्मविश्वास देत आहे. आज सकाळपासून आपण पाहत आहोत की काही वर्षांपूर्वी अध्यात्मिक केंद्रांमध्ये दिसणारी योगाची चित्रे आता जगाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागली आहेत. ही सामान्य मानवतेची चित्र आहेत. हा एक जागतिक उत्सव बनला आहे. हे केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळे यावेळची थीम ‘योग फॉर ह्युमॅनिटी’ अशी आहे. योग जगासमोर नेण्यासाठी मी संयुक्त राष्ट्रांचे आभार मानतो. मित्रांनो, आपल्या ऋषीमुनींनी योगबद्दल सांगितले आहे. योगमुळे आपल्याला शांती मिळते. याने आपल्या देशात आणि जगात शांतता नांदते. हे सर्व जग आपल्या शरीरात आहे. हे सर्वकाही सजीव करते. योग आपल्याला सतर्क, स्पर्धात्मक बनवते. योग लोक आणि देशांना जोडते. हे आपल्या सर्वांच्या समस्येचे निराकरण होऊ शकते. देश स्वातंत्र्याचा ७५वा वर्धापन दिन साजरा करत आहे. अशा परिस्थितीत देशातील ७५ ऐतिहासिक केंद्रांवर एकाच वेळी योगासने केली जात आहेत. हे भारताच्या भूतकाळाला भारताच्या विविधतेशी जोडण्यासारखे आहे. जगातील विविध देशांमध्ये लोक सूर्योदयापासून योगासने करत आहेत. सूर्य जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे विविध देशांतील लोक त्याच्या पहिल्या किरणाने एकत्र येत आहेत. हे गार्डियन रिंग ऑफ योगा आहे. मित्रांनो, जगातील लोकांसाठी योग हा केवळ ‘जीवनाचा भाग’ नसून आता ‘वे ऑफ लाइफ’ बनत आहे. आपल्या घरातील वडीलधारी मंडळी, योगसाधक दिवसभरात वेगवेगळ्या वेळी प्राणायाम करतात, मग पुन्हा कामाला लागतात हे आपण पाहिले आहे. आपण कितीही तणावात असलो तरी काही मिनिटांच्या योगामुळे आपली सकारात्मकता आणि उत्पादकता वाढते. आपल्यालाही योग साधायचा आहे’, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात योग दिन साजरा केला. तसेच योग दिनाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेतील नायगारा धबधब्याजवळ योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय आणि अमेरिकन नागरिक सहभागी झाले होते. त्याचबरोबर पाकिस्तानातील लाहोरमध्ये मुस्लिम महिलांनी बुरखा घालून योगा केला. तर, शेजारच्या नेपाळची राजधानी काठमांडू येथे योग दिनाच्या पूर्वसंध्येला धरहरा टॉवर दिव्यांनी उजळून निघाला. न्यूयॉर्कमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने योगदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाने आंतरराष्ट्रीय योग दिनासंबंधी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात अमेरिकन संस्थांनीही सहकार्य केले.