रत्नागिरी : गेल्या १८ वर्षांपासून अधीक काळ ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाद्वारे राज्यातील तमाम वहिनींचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील तमाम महिलांचा हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला आणि होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या महामिनिस्टर या नवीन पर्वाची सुरवात झाली आणि सगळ्यांच्या नजरा मुख्य पारितोषाकडे म्हणजेच ११ लाखांच्या पैठणीकडे लागल्या. नुकताच या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला असून, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे या महामिनिस्टर अर्थात विजेत्या ठरल्या आहेत.
दरम्यान, महा मिनिस्टर’ ची विशेष चर्चा झाली ती, ११ लाखांच्या पैठणीमुळं. कारण या पैठणीला अस्सल सोन्याची जर आणि हिरे असले तरी दिव्यांग कलाकारांनी ही पैठणी तयार केली आहे. त्यांच्या कौशल्यामुळे या पैठणीचं तेज आणखी वाढलं असल्याचे स्वतः बांदेकर यांनी व्हिडियोद्वारे सांगितले होते. या महाअंतिम सोहळ्यासाठी राज्याच्या काही जिल्ह्यातून १२ जणींची निवड करण्यात आली होती. प्रत्येकी एक लाखांची पैठणी देऊन या १२ जणींना सन्मानित करण्यात आले होते आणि ११ लाखांच्या पैठणीचा खेळ रंगला. १२ जणींमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी महाअंतिम सोहळ्यात चुरस रंगली. यात औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या सर्व वहिनींनी आपल्या शहरामधून बाजी मारत १ लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आणि ११ लाखांच्या पैठणीसाठी रंगलेल्या खेळात ११ लाखांची पैठणी रत्नागिरीच्या ‘लक्ष्मी मंदार ढेकणे’ यांनी जिंकली सध्या सोशल मीडियावर ११ लाखांची पैठणी नेसलेला त्यांचा एक सुंदर फोटो तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्मी ढेकणे यांच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.