मुंबई- राज्यातील अनेक भागात दडी मारलेला पाऊस पुन्हा बरसणार आहे. येत्या 48 तासांत मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्यापासून म्हणजे 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येत्या एक-दोन दिवसात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुण्यातही मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतही रविवार, 7 ऑगस्ट आणि सोमवार 8 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सूनचे पुनरागमन झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. याविषयी पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. अनुपम कश्यपी यांनी माहिती दिली.