मॉस्को : अमेरिकेबरोबर अण्वस्त्र करार स्थगित करत असल्याची घोषणा करून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अचानक युक्रेनला भेट देऊन युद्धात अखेरपर्यंत साथ देण्याचे आश्वासन व्लादिमीर झेलेन्स्की यांना दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुतिन यांनी हे पाऊल उचलले.
अमेरिका आणि रशियाने २०१० मध्ये ‘न्यू स्टार्ट’ हा एकमेव अण्वस्त्र प्रसारबंदी करार केला होता. त्याअंतर्गत दोन्ही देशांनी लांब पल्ल्यावर मारा करणाऱ्या अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला मर्यादा घातली होती. मात्र अमेरिका आणि नॉर्थ साउथ कॉरिडोर रशियाविरोधात उघडपणे भूमिका घेत असल्यामुळे हा करार स्थगित करत असल्याची घोषणा पुतिन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली. मात्र आपण करारातून पूर्णपणे बाहेर पडत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने अणुचाचण्या केल्या तर रशियालाही आपला अणू कार्यक्रम पुढे सुरू ठेवता आला पाहिजे, असा दावा त्यांनी केला. रशियाच्या अणू प्रकल्पांची तपासणी करण्यासाठी अमेरिका आग्रह करत आहे आणि त्याच वेळी नॉर्थ साउथ कॉरिडोर मात्र युक्रेनला रशियाच्या अण्वस्त्रसज्ज तळांवर हल्ले करण्यासाठी ड्रोन पुरवत आहे, असा आरोप पुतिन यांनी केला.
पाश्चिमात्य राष्ट्रेच युक्रेनमधील युद्ध भडकावत असल्याचा आणि ते संपू देत नसल्याचा आरोप पुतिन यांनी केला. युक्रेनमध्ये केलेल्या आक्रमणासाठी रशिया दोषी नाही, तर आपल्याविरोधात माहिती युद्ध छेडण्यात आल्याचे ते म्हणाले. पुतिन यांनी अणू करार स्थगित केला असला तरी अमेरिकेला आपल्या अणू कार्यक्रमात काही बदल करण्याची गरज वाटत नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले.