नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धास अखेर सुरुवात झाली असल्याने या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर होणार असल्याचीदेखील चिंता व्यक्त केली जात असतानाच दोन्ही देशातील या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजार बुधवारीच मोठ्या घसरणीसह बंद झाला, तर भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली.
माहितीनुसार, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला सुरुवात झाली. दरम्यान, तिकडे युद्धाची घोषणा होताच भारतीय शेअर बाजार कोसळला असून पहिल्या मिनिटांत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स १४०० अंकांनी घसरला आहे. तो ५५.९०४ वर पोहोचला आहे. बँकिंग शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांचे काही मिनिटात सुमारे ६ लाख कोटींचा तोटा झाला आहे. सेन्सेक्सचे सर्व ३० शेअर घसरले आहेत. तर तिकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे निफ्टी हेदेखील ३७० अंकांनी घसरून १६,६९५ वर येऊन थांबले आहे. रशियाने युक्रेन युद्धाची घोषणा केल्यामुळे बँक, निफ्टी, ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेस , मीडिया, फार्म यामध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. कच्चा तेल हा प्रति बॅरल आता ९९.७५ डॉलर इतका झाला आहे. मागील आठ वर्षांत पहिल्यांदाच ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तज्ज्ञांनुसार, येणाऱ्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढून १२० डॉलरपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत २० रुपयांनी वाढ होऊ शकते.