किव्ह – रशियाने युक्रेनच्या हवाई, समुद्र आणि जमीन अशा तीनही क्षेत्रांवर हल्ला चढवलाय. युक्रेनियन सैन्यानेही या युद्धात पुढाकार घेतला आहे, मात्र युक्रेनवर रशिया भारी पडला असून मोठा विध्वंस झाला आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी १३७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर शेकडो लोक जखमी झाल्याचेही कळतेय. दरम्यान, यात १० जवानांचाही मृत्यू झाला असून ३१६ नागरिक जखमी झाले असल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी दिली आहे.
रशियन सैन्याने गुरुवारी युक्रेनवर मोठा हल्ला केला. हवाई हल्ले आणि गोळीबारात तेथील शहरे आणि तळांना लक्ष्य केले. या युद्धात होरपळणारे सामान्य युक्रेनियन लोक गाड्या आणि कारमधून क्षेत्र सोडण्याचा प्रयत्न करताना दिसले. तर दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी माहिती दिली की, युक्रेनवरील हल्ल्याचा पहिला दिवस खूप यशस्वी झाला.
तसेच रशियन सैन्याने गुरुवारी उत्तर युक्रेनमधील पिपरियात शहराजवळील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाचा ताबा घेतला. रशियन संसदेने ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले की, चेर्नोबिल रशियन सैन्याने ताब्यात घेतले होते. चेर्नोबिल अणू प्रकल्पावर ताबा मिळवणे म्हणजे रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव्हपासून केवळ १०० किलोमीटर अंतरावर होते.