लोणावळा – पुणे – मुंबई महामार्ग हा लोणावळ्यातून जाताना अरुंद होतो, त्यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. यामध्ये काही नागरिकांना जीव गमवावा लागला, म्हणूनच या मार्गाचे रुंदीकरण करावे, यासाठी शहरवासीयांनी एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीकडे मागणी केली. पण त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संतापलेल्या नागरिकांनी आज ‘रास्ता रोको’ केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पुणे आणि मुंबईसह राज्यातील बहुतांश पर्यटक आज लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद लुटायला येत असतात. पण त्या सर्वांना या रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडीत ताटकळावे लागले.
या आंदोलनाला कोणतेही वेगळे राजकीय वळण लागू नये म्हणून जागरूक नागरिक म्हणून सगळे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या जागरूक नागरिकांचा रोष हा पर्यटकांवर नसून बेशिस्तपणे प्रवास करणाऱ्या अजवड वाहतुकीवर आहे. ही वाहतूक अरुंद रस्त्यात ही बेदरकरारपणे सुरु असते, असे या नागरिकांचे म्हणणे आहे. ही अवजड वाहतूक शिस्तीत जात नाही किमान रुंदीकरण करून त्यावर तोडगा काढा. अशी मागणी हे नागरिकांकडून वारंवार करण्यात आली होती.
दरम्यान, एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी झोपेचं सोंग घेऊन बसली आहे, ते आमच्या मागणीला गांभीर्याने घेतच नाहीत. असा आरोप नागरिकांनी यावेळी केला. नाईलाजास्तव आज रास्ता रोको करण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.