मुंबई- मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र आता याच नंबरवर मुंबईकरांना रस्त्यातील खड्डे, कचर्याचे ढीग तसेच आरोग्यासंदर्भातील थेट तक्रारी करता येणार आहेत.ही तक्रार करण्यासाठी इंटेलिजट व्हर्च्युअल असिस्टंट या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.विशेष म्हणजे एकदा तक्रार केल्यानंतर पुढे आणखी काय करावे लागेल याचीही माहिती संबंधित नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर कळवली जाणार आहे.
वास्तविकता मुंबई महापालिकेने कोरोना काळातच मोबाईल सेवा सुविधांची माहिती देण्याची प्रणाली सुरू केली आहे. त्याला व्हॉट्सअप चॅट-बॉट म्हटले जाते.यामध्ये पालिकेचे दवाखाने, रुग्णालये,शाळा,उद्याने, पर्यटनस्थळे अग्नीशमन केंद्रे पालिका कार्यालय आणि कोविड केअर सेंटर आदी ८० हून अधिक सुविधांचा समावेश आहे. आतापर्यंत मुंबईतील १ लाख ९७ हजार २९९ मुंबईकरांनी याचा लाभ घेतला आहे.यामुळे लोकांना गणेशोत्सव मंडप परवानग्या तसेच आपल्या पालिका विभागाची माहिती आणि संबंधित संपर्क क्रमांक घरबसल्या मिळत आहेत.