नाशिक : संजय राऊतांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र ठाणे पोलीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यांनतर राऊत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तर आता राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि याची सत्यता पडताळण्यासाठी ठाणे शहरातून २ पोलीस व्हॅन आणि एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सात जणांचे पथक नाशिक मध्ये दाखल झाले आहे.
संजय राऊत यांनी ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे, असे पत्र देवेंद्र फडणवीसांना लिहिले होते. या पत्राची दखल घेत राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता राऊतांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलीस नाशिकला पोहचले असून ठाणे पोलिसांकडून संजय राऊत यांचा जबाब घेण्याचे काम सुरू आहे.
ठाण्याचे एसीपी संजय राऊत यांच्या भेटीला नाशिकमध्ये दाखल झाले आहे. ठाणे पोलिसांच्या ७ जणांचे हे पथक नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये पोहोचले आहे. राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जवाब घेण्याचे काम सुरू आहे.त्यांची हॉटेलमध्ये चौकशी करण्यात येत आहे. संजय राऊत यांना ही माहिती कशी मिळाली आणि कोणी दिली याबाबतची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.