झालावाड – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. झालावाड क्रीडा संकुल येथून सकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या या यात्रेने सुमारे दहा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून दुपारच्या जेवणाची सुट्टी घेतली आहे. त्यानंतर ही यात्रा झालावाड जिल्ह्यातील देवरी घाटातून दुपारी निघून कोटा जिल्ह्यात दाखल झाली. राजस्थानमधील यात्रेत राहुल गांधी यांनी हातात कटपुतळ्या बाहुल्या नाचवल्या.
सुमारे 23 कि.मी.च्या प्रवासा नंतर पुढील चार दिवस ही यात्रा कोटा जिल्ह्यात राहणार आहे. यात्रेच्या राजस्थान प्रवेशाच्या दिवशीच राजस्थान काँग्रेसला नवे प्रभारी मिळाले. माकन यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे वरिष्ठ नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांची पक्षाने प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. रंधावा यांची काँग्रेस सुकाणू समितीचे सदस्य म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. 9 डिसेंबरला प्रवासासाठी सुट्टी असेल. यापूर्वी काल माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मतदारसंघ असलेल्या झालावाड जिल्ह्यात काँग्रेसने गर्दी जमवून राजकीय शक्ती प्रदर्शनचा प्रयत्न केला. ही यात्रा जिल्हा भाजप कार्यालयासमोरून गेल्यावर राहुल यांची प्रतिक्रिया पाहून सर्वांचेच हसू आले.प्रत्यक्षात ही यात्रा पाहण्यासाठी भाजप कार्यालयात सकाळपासूनच अनेकांची गर्दी झाली होती. राहुलची नजर त्याच्यावर पडताच त्यांनी फ्लाइंग किस देऊन लोकांना अभिवादन केले.