मुंबई – जोरात पाणी शिंपडून झोपेतून धाडकन जागं करावं आणि मग कावरंबावरं व्हावं, अशी अवस्था सध्या राज्याच्या सत्ताधाऱ्यांची झाली आहे. राजकीय वर्तुळातून दर पाचव्या मिनिटाला नवी हालचाल समोर येत आहे. या राजकीय उलथापालथी राजभवनातून शांतपणे पाहणाऱ्या राज्यलापालांनाही आता शांत बसवेना असं म्हणावं लागेल, कारण त्यांनाही एक धक्का बसला आहे. परंतु त्यांना कोणता राजकीय नाही, तर कोरोनाचा धक्का बसला. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली. मात्र काही दिवस त्यांना आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.
८० वर्षीय कोश्यारी हे कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून दिसतात. मात्र त्यांची तब्येत कालपासून खराब झाली होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांना ताप होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तात्काळ रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आता राज्यपालांची अनुपस्थिती असेल तर सध्याच्या परिस्थितीत सरकारबाबतचा निर्णय कसा घेतला जाईल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. गोव्याचे राज्यपाल श्रीधरण यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिला जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात होते. मात्र राजभवनाने स्पष्टीकरण देत हे वृत्त फेटाळले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा चार्ज कोणत्याही दुसऱ्या राज्यपालांकडे सोपवलेला नाही, असे स्पष्टीकरण राजभवनकडून देण्यात आले आहे.