नवी दिल्ली- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी 2 दिवसांच्या दिल्ली दौर्यावर जाणार आहेत. एकीकडे राज्यात अनेकवेळा वादग्रस्त विधाने करुन वादाच्या कचाट्यात अडकणारे राज्यपाल नुकतेच छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी शिवरायांविरोधात केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. बेताल वक्तव्य करणार्या राज्यापालांना पदावरुन हटवण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी आंदोलने केली. या राजकीय पक्षांप्रमाणेच अनेक संघटनादेखील सलग तिसर्या दिवशी देखील आक्रमक झाल्या. आता या आंदोलकांच्या मागणीचा राज्य व केंद्र सरकार काय निकाल लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या बादशाहाच्या इशार्यावर कोश्यारी वक्तव्य करत असतात असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला होता. एकीकडे राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी होत असताना आता राज्यपाल कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौर्यावर जाणार आहेत.