मुंबई- राज्यातील काही भागात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे नुकासान झाले आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील काही गावांमध्ये शुक्रवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पांगरी, लिंबोटा, तळेगाव या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदीन झाला. बळीराजा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे.
जळगाव येथील पारोळा तालुक्यात पावसामुळे सुमारे ३० घरांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रुपांतर शेततळ्यात झाले आहे. शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, मका, बाजरी व कांद्यासह जनावरांचा चारा कडवळाचे पीक संपूर्णपणे भुईसपाट झाल्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आंबोली येथे ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बेळगाव-सावंतवाडी महामार्ग बंद केला होता. आंबोली घाटातील धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह रस्त्यावर आले होते. राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला असताना सोलापुरात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला होता. तसेच पुरंदर तालुक्यातील काळदरी परिसरातील बांदलवाडी, रामवाडी, कोंडकेवाडी परिसरात ढगफुटीमुळे भात शेती बरोबर रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर गावच्या सरपंच गणेश जगताप यांनी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.