सेवानिवृत्त शिक्षकांनाही मिळणार सेवेची संधी
सोलापूर- राज्यातील जिल्हा परिषद शाळांपैकी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांना दुसर्या शाळेत समाविष्ट करून त्यांच्या जागी कंत्राटी आणि सेवानिवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय माहिती शिक्षण संचालक कार्यालयातून कळत आहे.
राज्यात कमी पटसंख्या असलेल्या म्हणजे पटसंख्या १५ ते १८ इतकी असणार्या ४,७८९ जिल्हा परिषद शाळा आहेत.तर राज्यातील एकूण शाळांची संख्या ६० हजार ९१२ आहेत.विशेष म्हणजे मागील सहा-सात वर्षापासुन कमी पटसंख्या असलेल्या शाळा तशाच सुरू आहेत. तिथे विद्यार्थी कमी असूनही त्याच्या तुलनेत शिक्षकांची संख्या जास्त आहे.काही ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंतची पटसंख्या १४ तर शिक्षकांची संख्या ३ आहे. तर दुसरीकडे विद्यार्थी संख्या जास्त असून शिक्षक कमी आहेत. अलीकडे दळणवळण साधने वाढल्याने विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमांकडे जाण्याचा कल जास्त प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे कमी पटसंख्या काही वाढताना दिसत नाही. तरीही त्या शाळा बंद करून चालणार नाहीत.अशा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांना अन्य शाळेत हलवून त्यांच्या जागी चांगल्या मानधनावर कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षक नेमले जाणार आहेत.तर पटसंख्या अनेक वर्षे वाढत नसलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसर्या जवळच्या शाळेत पाठविले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.