मुंबई – महाराष्ट्राच्या तापमानात रविवारपर्यंत ३ अंशांपर्यंत घट होणार आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढणार आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल जाणवत आहे. राज्याच्या बहुतांशी शहरांचे तापमान कमी झाले आहे. असे असताना उद्या ११ नोव्हेंबरपासून राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घसरले आहे. विदर्भात किमान तापमान स्थिर आहे. परंतु रविवारपर्यंत राज्यातील तापमानात ३ अंशांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील ३ दिवसांत राज्यात ३ अंशांपर्यंत तापमान घसरणार असल्याने थंडीचा कडाका वाढणार आहे. खान्देशात थंडीचा प्रभाव जास्त राहील. दुपारच्या कमाल तापमानातही त्यामुळे फरक पडेल. ही थंडी रब्बी पिकांना पोषक आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.