मुंबई – राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात मंगळवारी सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा निकाल जाहीर करणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायती निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार असून या सुनावणीत निवडणुकांच्या तारखांबाबत काय निकाल लागणार, याकडे राज्यातील राजकीय मंडळींसह नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द ठरवल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारसमोर पेच निर्माण झाला होता. त्यानंतर कोर्टाने ओबीसी आरक्षणाशिवाय लवकरात लवकर निवडणुका घ्या, अशा सुचना राज्य निवडणूक आयोगाला दिल्या होत्या. मात्र राजकीय पक्ष ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत मात्र, राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला. या अर्जात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात याव्यात, असे म्हटले. या अर्जावर आता मंगळवारी सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहेत.