मुंबई – काही दिवसांपूर्वी नको नकोशी झालेली थंडी आता बऱ्यापैकी ओसरली आहे. राज्यात दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ कायम असून उन्हाचा चटका आता तीव्र झाला आहे, तर रात्रीच्या हवेतील गारवाही घटला आहे. ही तापमानवाढ पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील किमान तापमान २ ते ५ अंशांनी वाढले असल्याने येथील थंडी गायब झाली आहे. विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, इत्यादी भागांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी वाढले असल्याने दिवसा उकाडा जाणवतो आहे. कोकण विभागातील मुंबई परिसरात कमाल तापमानाचा पारा सरासरीजवळ असला, तरी रत्नागिरीसह कोकणात इतर ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, इत्यादी भागांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी वाढले आहे. अनेक भागातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.