पुणे – मान्सूनचे आगमन लांबले असले तरी राज्यात पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज, गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला होता. तर उद्या, शुक्रवारपासून कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाकडून ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण भारतात परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती असून राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. तर, मान्सूनबाबत बोलायचे झाल्यास केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आणि त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला. अशात वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला नाही, आता १२ ते १३ जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी नवी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.