पुणे- दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत 21 पैकी 10 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी मतदान होणार आहे. सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. आज मतदान झाले असून, मतमोजणी सोमवारी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
अ-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदारसंघातून मुंबई-कोकण विभागातून सिद्धार्थ कांबळे, पुणे विभागातून दिगंबर दुर्गाडे, नाशिक विभागातून गुलाबराव देवकर, औरंगाबाद विभागातून अर्जुनराव गाढे आणि अमरावती विभागातून वसंत घुईखेडकर बिनविरोध निवडून आले आहेत. ब-नागरी सहकारी बँक मतदारसंघातून पुणे विभागातून सुभाष जोशी आणि भाऊ कड, नागपूर विभागातून रवींद्र दुरगकर, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून संजय भेंडे, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विश्वास ठाकूर बिनविरोध झाले आहेत.
असोसिएशनच्या संचालक मंडळात मुंबई व कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या विभागातून अ-जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहा प्रतिनिधी असतात. त्यापैकी मुंबई व कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती विभागातून संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे, तर नागपूर विभागातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. ब-नागरी सहकारी बँकांचे मुंबई व कोकण विभाग, पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागातून प्रत्येकी दोन, तर नागपूर आणि अमरावती विभागातून प्रत्येकी एक प्रतिनिधी संचालक असतो. त्यापैकी पुणे विभागातील दोन, तर नागपूर विभागातील एक संचालक बिनविरोध झाले आहेत.