संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते – गुरु माँ कांचन गिरीजी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गुरु माँ कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ वर जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांचं सपत्नीक स्वागत केलं. त्यानंतर राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली.
कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. गुरु माँ कांचन गिरीजी यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, उत्तर भारतीयांवर राज ठाकरेंचं प्रेम आहे. राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प राज ठाकरे पूर्ण करतील.

कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी राज ठाकरेंच्या भेटी आधी शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर गुरु माँ कांचन गिरीजी म्हणाल्या की, देशाच्या फाळणीनंतर जम्मू-काश्मीरमधील हिंदूंचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. जर आतापासूनच त्यांच्या बाजूने उभे राहिलो नाही तर १० वर्षांत ते शरणार्थी म्हणून राहतील. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यामुळे आज जम्मू – काश्मिरची भीषण अवस्था झाली आहे. परिस्थिती वेळीच व्यवस्थित हाताळली गेली नाही तर येत्या दहा वर्षात देशाची अवस्था अफगाणिस्तानासारखी होईल. आता हिंदूंचे अस्तित्व कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

आम्ही सर्वच पक्षातील नेत्यांना भेटून मार्गदर्शन करत आहोत. राज त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना खूप स्पष्ट आहे. त्यांच्या मनात उत्तर भारतीयांबद्दल प्रेम आहे. परप्रांतीयांबद्दल त्यांच्या मनात काही गैरसमज आहे. हे गैरसमज दूर करण्याचे आम्ही प्रयत्न केले. राज ठाकरे यांच्या मनात परप्रांतियांविरोधात कोणताही द्वेष नाही हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवलं. स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यांवर ते बोलत असतात. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपसोबत जावं. त्यांच्या मनात उत्तर भारतीयांबाबत जो पूर्वग्रह झालाय तो मी दूर करेन. ते समजुतदार आहेत त्यामुळे ते हे समजून घेतील, असा विश्वास कांचन गिरी यांनी व्यक्त केला.

गुरु माँ कांचन गिरीजी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करत होते. ते हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे हिंदूंसाठी बोलायचे. उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला. पालघरमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ‘नरो वा, कुंजरो वा’ म्हणत आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केले होते, असा आरोप कांचन गिरी यांनी उद्धव ठाकरेंवर केला. असं मत गुरु माँ कांचन गिरीजी यांनी व्यक्त केले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. राज यांच्या या नव्या भूमिकेमुळे मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याचे संकेतही मिळत आहोत. गेल्या वर्षी दसऱ्याला मनसेनं ‘गर्व से कहो, हम हिंदू है’, अशा आशयाचे पोस्टर्स लावले होते. तसंच, मनसेनं झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याची चर्चा आहे. या भेटीमुळे महापालिका निवडणुकीआधी मनसेची हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वाटचाल असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami