मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 8 जून रोजी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतील खार पोलीस स्थानकाने 4 जून रोजी ही नोटीस राणा दाम्पत्याच्या मुंबई वांद्य्रातील निवासस्थानी
पाठवली होती.
पोलिसांनी राणा दाम्पत्यास हजर राहण्याचे निर्देश नोटीशीतून दिले आहेत. दरम्यान, यापूर्वी राणा दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारसोबतच मुंबई पोलिसांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. राणा दाम्पत्याने कोठडी आणि लॉकअपमध्ये असभ्य वागणूक दिल्याबद्दल पोलिसांवर विविध आरोप केले होते. हनुमान चालिसा प्रकरणावेळी जेव्हा पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी गेले होते, त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. त्या संबंधित ही नोटीस मुंबई पोलिसांनी त्यांना बजावली आहे. याप्रकरणी येत्या 8 जून रोजी राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. राणा दाम्पत्याला वांद्रे येथील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आमदार रवी राणा हे राज्यसभेसाठी मतदान करणार की नाही अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. मुंबई खार पोलीस 8 जून रोजी राणा दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत.