सिंधुदुर्ग – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवलीतील ओम गणेश बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यासाठी काढलेला मोर्चा कणकवली पोलिसांनी रस्त्यावरच अडवल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. या इशार्यानंतर सिंधुदुर्गातील कणकवलीत वातावरण तापले आणि काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच राणे समर्थक हे आक्रमक झाले. ते ओम गणेश बंगल्याबाहेर सकाळपासूनच एकत्र आले होते. यावेळी राणे समर्थकांनी काँग्रेस आणि नाना पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राणेंच्या बंगल्याबाहेर श्रीफळ वाढवून मालवणी भाषेत गार्हाणे मांडले. काँग्रेसला सद्बुद्धी देरे म्हाराजा असे गार्हाणे राणे समर्थकांनी मांडले. राणे समर्थक आक्रमक झालेले असतानाच राणे यांच्या बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यासाठी मोर्चा निघाला होता. मात्र काँग्रेस कार्यालयाच्या काही अंतरावरच हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे तेथे एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.