इमारतीची मोठी हानी दोन जण जखमी
बर्लिन – जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मध्य भागात असलेले जगप्रसिद्ध असे एक मोठे मत्स्यालय रात्रभर उणे १० अंश सेल्सिअस तापमान ठेवल्याने शुक्रवारी फुटले.त्यामुळे येथील पर्यटकांचे एक आकर्षण स्थळ नष्ट झाले.हे मत्स्यालय जगातील सर्वात मोठे दंडगोलाकार मत्स्यालय होते.यातून एक दशलक्ष लिटर पाण्याचा लोट बाहेर पडल्याने संबंधित इमारतीचेही नुकसान झाले. दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे जर्मन पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
त्यात ८० वेगवेगळय़ा प्रजातींचे एक हजार पाचशे उष्णकटिबंधीय मासे होते. २०२० मध्ये त्याचे आधुनिकीकरण केले होते. हे मत्स्यालय बर्लिनमधील पर्यटनस्थळ होते.या मत्स्यालयातून दहा मिनिटांची ‘लिफ्ट राईड’ हे प्रमुख आकर्षण होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी सहाच्या सुमारास हे २५ मीटर म्हणजेच ८२ फूट उंच दंडगोलाकार मत्स्यालय फुटले. हे मत्स्यालय ज्या इमारतीत आहे, तेथे हॉटेल व कॅफेही आहेत. बर्लिनच्या अग्निशमन विभागाने सांगितले, की या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली कुणी अडकले आहेत का, याचा श्वानपथकाकडून शोध घेतला गेला. फुटलेल्या काचा व इतर ढिगारा उपसण्यात आला.रात्रभर उणे १० अंश सेल्सियसपर्यंतच्या गोठणबिंदू खालील तापमानामुळे या मत्स्यालयाच्या काचेला तडा गेला होता. त्यानंतर पाण्याच्या दबावाने ते फुटल्याचा अंदाज आहे. नेमके कारण तपासले जात आहे. परंतु घातपाताच्या घटनेचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.या दुर्घटनेची साक्षीदार ग्वेंडोलिन स्झिस्कोविट्झ हिने जर्मन वृत्तवाहिनी ‘एन-टीव्ही’ला सांगितले की तिने मोठा आवाज ऐकला. सुरुवातीला बॉम्बस्फोट झाल्याची भीती तिला वाटली.