अलिबाग – तालुक्यातील साखर आक्षी ते रेवदंडा दरम्यान समुद्रात रात्रीच्या काळोखात अवैधरीत्या पर्ससीन जाळीने मासेमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्य विभागाने धाड मारून ही नौका आणि लाखो रुपये किंमतीचे मासे जप्त केले. मात्र यावेळी या नौकेवर मासेमारी करणारे १६ खलाशी तांडेलसह ही जप्त केलेली नौका घेऊन पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आता या सर्वांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या बोटीचे नाव सागरकन्या असे होते.
मत्स्य व्यवसाय विभागाने या नौकेवरून २ हजार किलो चांद पापलेट, ४ हजार किलो कुपा मासळी, २ हजार किलो बांगडा, ५०० किलो सुरमई अशी ४ लाख ८० हजार रुपये किंमतीची मासळी जप्त केली होती. या मासळीचा लिलाव करण्यासाठी ही नौका शनिवारी रात्री किनाऱ्याकडे चालली होती. त्याचवेळी मत्स्य विभागाच्या परवाना अधिकारी डॉ. रश्मी आंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला या खलाशांनी नौकेतील डिझेल संपल्याने इंजिन बंद पडल्याचा बहाणा केला होता पण तपासणीत खरा प्रकार उघडकीस आलाच. या सर्वांना किनाऱ्याकडे आणत असताना मध्येच दोन नौकांना बांधलेला दोर कापून तांडेल आणि सर्व खलाशी पसार झाले. या नौकेचा तांडेल सिकंदर निशाद याच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.