अलिबाग – रायगड जिल्ह्यातील एसटी आगारासह अनेक स्थानकातील कॅन्टीन बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत वास्तव समोर आले आहे.कॅन्टीन बंद असल्याने यातून भाडय़ापोटी एसटीला मिळणारा महसुलही बुडत चालला आहे.रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, रोहा, कर्जत,पेण,माणगाव,महाड, श्रीवर्धन असे आठ एसटी आगार आहेत.
प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या सवलतीमधून विद्यार्थ्यांसह प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. आरामदायी प्रवासासाठी तीन विनाथांबा बसही सुरू आहेत.जिल्ह्यात औद्योगिकीकरणासह पर्यटनही झपाट्याने वाढत असल्याने ऐन हंगामात प्रवाशांची एसटी स्थानकात गर्दी होते.लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी पोहचल्यावर प्रवासी चहा, कॉफी, नास्ता, जेवणासाठी कॅन्टीनचा शोध घेतात. मात्र जिल्ह्यातील रामवाडी, पोलादपूर व इंदापूर स्थानक व माणगाव आगार वगळता श्रीवर्धन, रोहा, अलिबाग, मुरूड, पेण, कर्जत, महाड एसटी आगार व रेवदंडा, खोपोली येथील स्थानकात कॅन्टीनच नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचीही गैरसोय होते. एसटी आगार, स्थानकाच्या आवारात कॅन्टीन नसल्याने प्रवाशांना खासगी हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसाही जास्त खर्च होत आहे.रामवाडी, पोलादपूर, इंदापूर, माणगाव स्थानकातील कॅन्टीनसह श्रीवर्धन, रोहा,अलिबाग, मुरूड, पेण, कर्जत, खोपोली, रेवदंडा, महाड, एसटी आगारातील कॅन्टीनला प्रवाशांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते बंद करण्यात आले. अन्य ठिकाणचे बंद कॅन्टीन सुरू करण्याबाबत निविदा मागवल्या आहेत; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत. अलिबाग एसटी आगारातील कॅन्टीन लवकरच सुरू होणार आहे.प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कायम प्रयत्न केले जात आहेत असे रायगड विभाग एसटी नियंत्रक दीपक घोडे यांनी सांगितले