कोलकता:- पश्चिम बंगाल मंत्रीमंडळातील मंत्री आणि तृणमूलचे नेते अखिल गिरी यांनी एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधत असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.सुवेंदू अधिकारी यांना उद्देशूनही टीका करत होते. ते म्हणाले, ‘सुवेंदू अधिकारी म्हणतात, मी चांगला दिसत नाही. मग सुवेंदू अधिकारी तरी किती सुंदर दिसता? आपण कुणाचेही मूल्यमापन त्यांच्या दिसण्यावरून करत नाही. आपण देशाच्या राष्ट्रपतींचा नक्कीच सन्मान करतो. पण आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?’ असा प्रश्न उपस्थित करून गिरी उपस्थितांकडे बघून हसू लागले.
दरम्यान, भाजपाने तृणमूलवर टीका केली आहे. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातल्या आहेत. अखिल गिरी यांनी त्यांच्याविषयी दुसऱ्या एका मंत्र्याच्या उपस्थितीत आक्षेपार्ह विधान केले. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस हे आदिवासीविरोधी आहेत”, अशी टीका पश्चिम बंगाल भाजपाने आपल्या ट्विटर हँडलवरून केली आहे. मात्र, या वादावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.