कोटा -राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो सध्या राजस्थानात पोहचली आहे. ही यात्रा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या झालावाडमधून आता कोटा जिल्ह्यात दाखल झाली आहे. या पदयात्रेत देशातील अनेक विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आता या यात्रेत ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्त्या अरूणा रॉय यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी राहुल गांधींसोबत संवाद साधला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.
याआधी भारत जोडो यात्रेत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर देखील सहभागी झाल्या होत्या. तसेच भारत जोडो यात्रेच्या सुरूवातीपासून जेष्ठ विचारवंत प्रोफेसर योगेंद्र यादव चालत आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रेला देशातील मोठ्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. या यात्रेतील अनेक फोटो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
सध्या फुटबॉल वर्ल्ड सुरू आहे. त्यामुळे राहुल गांधींचे फुटबॉल प्रेम देखील दिसून आले. राहुल गांधी यांनी यात्रे दरम्यान फुटबॉल विश्वचषक सामन्याचा आनंद लुटला. हा सामना त्यांनी मोठ्या पडद्यावर पाहिला. राहुल गांधी यांचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी मोठ्या स्क्रीनवर मोरोक्को विरुद्ध स्पेन यांच्यातील फुटबॉल सामन्याचा आनंद घेत होते.
दरम्यान राजस्थानमधील झालावाडमध्ये भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु राहुल गांधी यांनी भाजप कार्यकर्त्यांनी फ्लाईंग किस देत त्यांच्या घोषणांवर वेगळीच प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे बॅनर पाहून त्यालाही प्लाईंग किस दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.