उज्जैन: खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात पोहोचली आहे. या यात्रेत देशभरातील सामाजिक कार्यकर्ते, कलाकार यामध्ये सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर देखील सहभागी झाली होती. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन स्वराचा भारत जोडो यात्रेतील फोटो शेअर करण्यात आला आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या बेधडक वक्तव्य आणि ट्विट्ससाठी प्रसिद्द आहे. प्रत्येक सामाजिक मुद्द्यांवर ती भाष्य करत असते. स्वराने काही दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला पाठींबा दिला होता. यामुळे स्वराला ट्रोलही व्हावे लागले होते. दरम्यान अभिनेत्री स्वरा भास्करच्या भारत जोडो यात्रेतील सहभागावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत तुकडे तुकडे गॅंग समर्थक स्वरा भास्कर आणि कन्हैया कुमार यांसारख्या देशविरोधी मानसिकतेच्या लोकांचा सहभाग म्हणजे भारत तोडणाऱ्यांच्या समर्थनार्थ ही यात्रा काढण्यात येत असल्याचा हा पुरावा आहे. यापूर्वी या यात्रेत अमोल पालेकर, संध्या गोखले, पूजा भट्ट, रिया सेन, सुशांत सिंग, मोना आंबेगावकर, रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी या चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी भाग घेतला होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला 85 दिवस पूर्ण झाले आहेत.मध्य प्रदेशातून ही यात्रा 4 डिसेंबरला राजस्थानमध्ये दाखल होणार आहे.राजस्थानात ही यात्रा १२ दिवस असणार आहे. त्यासाठी राजस्थान काँग्रेसकडून तयारी केली जात आहे.