संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल नाही, जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के राहणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल न करता तो ४ टक्के इतका कायम ठेवण्यात आला असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के इतका ठेवण्यात आला असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

महागाई दर आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असताना आरबीआयकडून रिव्हर्स रेपो दरता बदल केले जातील असे म्हटले जात होते. रिझर्व्ह बँकेने येत्या आर्थिक वर्षात विकास दर ७.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, जागतिक बाजारपेठेत कोरोना महासाथीच्या आजारामुळे अनेक आव्हाने समोर आली. भारतालादेखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आरबीआयनेदेखील मोठी भूमिका बजावली आहे. आता कोरोना महासाथीला पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेतील व्यत्यय मर्यादित करण्याचा प्रयत्न आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी सलग ९ व्यांदा व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. रेपो रेट ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. आताही रेपो दर कायम ठेवण्यात आला आहे. मागील काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढवण्यात आले आहेत.

कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने महागाईचा भडका उडण्याचा धोका आहे. भारत अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी वेगळा मार्ग अवलंबत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये वर्षानुवर्षे सर्वात वेगाने वाढण्यास नेहमी सज्ज असतो. यामुळे भारतीय वित्तीय व्यवस्था अगदी लवचिक राहिली आहे. तसेच गुंतवणूक वाढत असल्याचे शक्तिकांत दास यांनी नमूद केले आहे. महामारीच्या बँकांवर होणार्‍या परिणामाबाबत आपण सावध राहिले पाहिजे. जोखीम व्यवस्थापन धोरणे आणखी मजबूत करण्यासाठी बँकांना योग्य तो सल्ला दिला जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, आरबीआयने पतधोरण जाहीर करताच शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami