मुंबई- राजापूर तालुक्यातील बारसू-गोवळ येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार आहे. राज्य सरकारने पश्चिम किनार्यावरची जगातील सर्वात मोठी विनाशकारी रिफायनरी या भागात व्हावी, असे संमती पत्र केेंद्र सरकारला दिले आहे, अशी माहिती काल भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. यावरुन आता मोठा वाद सुरु झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांनी लवकरात लवकर याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने केली आहे. तसेच त्यांच्या स्पष्टीकरणानंतरच पुढील दिशा ठरवू असा इशाराही दिला आहे.
बारसु-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी सांगितले की, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्य सरकारने पश्चिम किनार्यावरची जगातील सर्वात मोठी विनाशकारी रिफायनरी बारसू-गोवळ भागात व्हावी असे पत्र केंद्राला दिले, हे पत्रकार परिषद घेऊन काल सांगितले. यावर राज्य सरकार, स्थानिक खासदार, पालकमंत्री, उद्योगमंत्री एकंदर शिवसेना पक्षाने स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही. लवकरच ते आपले स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा आहे. जनतेसोबत राहण्याची पक्षाची भूमिका बदलली की नाही व कोकणाची राखरांगोळी होऊ देणार नाही, असे वचन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कितपत पाळतात हेही समजेल. त्यांच्या स्पष्टीकरणावर स्थानिक व कोकणी जनता पुढे नक्की काय कृती कार्यक्रम राबवायचे ते ठरवेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच विनाशकारी रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होऊ देणारच नाही याबाबत आम्ही ठाम असल्याचेही बोळे यावेळी म्हणाले.