लोणावळा – पावसाळ्यात लोणावळा, खंडाळ्याला जाण्यासाठी पर्यटकांची कायमच पसंती असते. लोणावळा-खंडाळा परिसरात सध्या रिमझिम पाऊस सुरू असून निसर्ग छान खुलला आहे. हे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पुणे आणि मुंबईतील पर्यटकांनी आज मोठी गर्दी केली होती. भुशी धरण, लायन्स पॉइंट, खंडाळ्यातील राजमाची पॉइंट येथे वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल झाले होते.
पर्यटकांच्या गर्दीमुळे लोणावळ्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. बहुतेक पर्यटक खरेदी करताना आपली वाहने दुकानांसमोर उभी करत असल्याने कोंडीत आणखी भर पडली. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. भुशी रस्ता, बाजारपेठ, खंडाळा, पुणे-मुंबई महामार्गावरील अपोलो गॅरेज, महावीर चौक, गवळी वाडा, हॉटेल कैलास पर्वतपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, सध्या पर्यटकांच्या संख्येमुळे लोणावळा-पुणे लोकलगाड्यांनाही गर्दी पहावयास मिळत आहे.