रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेलने फ्युचर समूहातील स्टोअर्स ताब्यात घेतली आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही रिलायन्सने नोकरीची ऑफर दिली आहे. यामुळे ते रिलायन्सचे कर्मचारी होतील. फ्युचर समूहाचे प्रमुख रिटेल किंग किशोर बियाणी आणि अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन यांच्यातील वाद कोर्टात असताना रिलायन्सने हे धाडसी पाऊल उचलले. याशिवाय रिलायन्स आता ‘बिग बाजार’चे नाव बदलणार आहे.
फ्युचर समूह विकत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिलायन्स रिटेलने या समूहाच्या दुकानांचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात बिग बाजारचे स्टोअर्स ताब्यात घेतले आहेत. तेथील कर्मचाऱ्यांना रिलायन्स रिटेलमध्ये समाविष्ट होण्याची ऑफर कंपनीने दिली आहे. याशिवाय बिग बाजारचे नाव बदलण्यात येणार आहे.
रिलायन्स आणि फ्युचर यांच्यात ऑगस्ट २०२० मध्ये करार झाला. त्यात हा समूह रिलायन्सने विकत घेतला. याची घोषणा होताच फ्युचर स्टोअरच्या अनेक जागा मालकांनी रिलायन्सकडे फोन करून थकलेले भाडे देण्याची मागणी केली. काहीजणांनी लीज आणि नवीन भाडेकरारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर आता रिलायन्सने फ्युचर समूहांचे स्टोअर्स ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दुकानांची संख्या आणि व्यवसायाचे स्वरूप लक्षात घेऊन रिलायन्स आणखी ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. फ्युचर समूहाचे १ हजार ७०० पेक्षा अधिक रिटेल स्टोअर्स आहेत. त्यात बिग बाजारचा समावेश आहे.