मुंबई- आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईत दर्जेदार महागडी हॉटेल आहेत. मात्र शहरांवर अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त माफक दरात तासांवर उपलब्ध होणारी सुरक्षित जागा शहरात उपलब्ध नाही. यामुळे आयआरसीटीसीने मुंबईत मुंबई सेंट्रल आणि सीएसएमटी या दोन स्थानकांवर पॉड हॉटेल्स उभारली आहेत.या हॉटेल्सना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. प्रामुख्याने सीएसएमटी स्थानकात हे हॉटेल प्रवाशांचे हमखास पसंतीचे ठिकाण बनले आहे.दिवसाला किमान २५ ते ३० प्रवाशांची इथे नोंद झालेली दिसून येते. या हॉटेलला कॅप्सूल हॉटेल असेही संबोधले जाते.
या पॉड हॉटेलमधील खोल्या आकाराने लहान आणि कॅप्सूल सारख्या दिसतात. त्यांचे भाडे अप्पर सिंगल बेड -५५९ रुपये, सिंगल लोअर बेड- ७८३ ,डबल अप्पर बेड-११२०,डबल लोअर बेड-१३४४ आणि फॅमिली बेड ४ व्यक्तींसाठी १६८० रुपये इतके आहे.हे भाडे १२ ते २४ तासांसाठी आकारले जाते.या हॉटेलमध्ये रेल्वेचा पीएनआर तपासून योग्य नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाली की खोलीचा ताबा संबधित प्रवाशाला दिला जातो.सीएसएमटीमधील हे पॉड हॉटेल यंदाच्या जुलैमध्ये बांधले होते.पण ते प्रत्यक्षात सुरू व्हायला थोडा उशीरच झाला होता. पण तरीही गेल्या तीन महिन्यांत या पॉड आणि कॅप्सूल हॉटेलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.सर्वसामान्यांच्या आवाक्यात हे पॉड आहे. त्याचबरोबर देशी-विदेशी पर्यटकांना राहण्यासाठी हा नवा पर्याय उपलब्ध आहे.